Friday, 19 October 2018

भूम तालुक्याचाही दुष्काळी तालुक्यांच्या यादीत झाला समावेश


               जिल्हयातील भूम तालुक्याचा  समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये शासनाकडून करण्यात  आला आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 या शासन निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन करण्यासाठी शासनाने भूम तालुक्याचा समावेश निश्चित केला आहे. त्यानुसार ट्रिंगर 2 लागू झालेल्या भूम तालुक्यामध्ये क्षेत्रिय स्तरावर ग्राउंड टुथिंगची कार्यवाही शासनाने हाती घेतली आहे.
         खरीप हंगामात सप्टेंबर 2018 अखेर करण्यात आलेल्या मुल्यांकानुसार ट्रिंगर 2 लागू झालेला आहे. या तारखांतील 10 टक्के गावे रॅंडम पध्दतीने निवडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहेत. पावसाअभावी टंचाई दृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावात आवश्यक त्या उपाययोजना करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे.  आता याचा लाभ भूम तालुक्यासाठीही शासनाकडून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वस्तूनिष्ठ माहिती सादर करण्याचे काम करण्यात आले आहे.
     यासंदर्भात जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे यांनी संबंधित सर्व विभागातील अधिकाऱ्यांना आदेश दिले असून स्वत: पालकमंत्री अर्जून खोतकर,जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केल्याने भूम तालुक्याचा सदृश्य परिस्थितीचा आढावा घेवून ट्रिगर२ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

Thursday, 18 October 2018

पुस्तक माणसाचं मस्तक घडवत असतं -- यशवंत भंडारे यांचे प्रतिपादन

            पुस्तक माणसाचं मस्तक घडवत असतात आणि बिघडवतही असतात. त्यामुळे वाचनातून ज्या गोष्टी हिताच्या असतात त्याचाच अंगीकार करणे आवश्यक असते, असे प्रतिपादन लातूर विभागाचे माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांनी काल येथे केले.        
            शासकीय ग्रंथालयात आयोजित भारताचे मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.
            श्री. भंडारे म्हणाले, पुस्तके ही समाज घडवण्याचे काम करत असतात. वाचन संस्कृतीमुळेच आदर्श भारत घडला असून युरोप व आशिया खंडात तथागत गौतम बुध्दाच्या काळापासूनच वाचन संस्कृतीची वाटचाल सुरु आहे. ग्रंथालयाच्या माध्यमाद्वारे खेड्यापाड्यात वाचनालयातून वाचन चळवळीला बळकटी येणार असल्याचेही प्रतिपादन केले. तसेच शिक्षणाची गुणवत्ता वाढवून नवीन तंत्रज्ञान आणि समाजाचा विकास साध्य करुन आधुनिक भारताचे स्वप्न साकार होण्यास ही चळवळ कामी येणार आहे.
            याप्रसंगी समग्र शिक्षा, जिल्हा परिषद लातूर येथील सहायक कार्यक्रम अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी मार्गदर्शन करताना म्हणाले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे वृत्तपत्र वितरक ते भारताचे राष्ट्रपती असा प्रवास केला. ते म्हणत अशी स्वप्न बघा की, त्या स्वप्नामुळे आपल्याला झोपच येणार नाही.
            देशात सामाजिक समता, स्वातंत्र्य व बंधुभाव ही संकल्पना दृढ करण्याचा समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न केला पाहिजे. वाचन संस्कृती ही इ. स. 261 मध्येच राजा सम्राट अशोकाने यात परिवर्तन घडविले आणि तथागताने इ.स. पूर्व 528 साली वाचन संस्कृतीची गतिशीलता वाढविली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचन संस्कृतीसाठी राजगृह केवळ म्हणजे केवळ पुस्तकासाठीच बांधले. त्यातूनच आज देशाचा कारभार सुरु आहे. सामाजिक विचार जागृत करणे व सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक एकोपा निर्माण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुनिल गजभारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश रेड्डी यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल सुरवसे यांनी केले.
            शासकीय ग्रंथालयात दुर्मिळ पुस्तक व ग्रंथाचे भव्य असे प्रदर्शन व मांडणी करण्यात आली होती. कार्यक्रमास वाचक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
                                                                            ***

Wednesday, 26 September 2018

दि.26 सप्टेंबर 2018 परंडा तालुक्यातील सेना खैरी उर्फ चांदणी नदीपात्राच्या परिसरात कलम 144 लागू

           परंडा तालुक्यात सिना, खैरी,उल्फा, चांदणी या नद्या असून या नद्यांच्या पात्रांमध्ये लहान मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. तांदुळवाडी,खासगाव, सोनगिरी, रुई दुधी, भोत्रा,  देवगाव, वडनेर या वाळूगटातून अनधिकृतपणे वाळू उपसा व वाहतुकीच्या  प्रकरणाबाबत वारंवार तक्रारी, संदेश प्राप्त होत आहेत.अवैध वाळू चोरी वाहतुकीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नदीपात्रात वाहनाने प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी त्यांच्या अधिकारानुसार 21 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 6.00 ते दिनांक 20 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत परंडा तालुक्यातील मौजे तांदुळवाडी, खासगाव, सोनगिरी,भोत्रा देवगाव, वडनेर,शेळगाव, चिंचपूर या गावातील नदीपात्रामध्ये किंवा वाळू गटाच्या ठिकाणी वाहनाने प्रवेश करण्यास, अवैध उत्खनन करण्यास तसेच वाहतूक करण्यास प्रतिबंध केला आहे. 
           हा आदेश लागू असलेल्या कालावधीत कोणतेही वाहन जसे जेसीबी, पोकलेन, ट्रक, ट्रॅक्‍टर व इतर, मजूर, ठेकेदार, वाहनचालक व अन्य चार चाकी वाहन व व्यक्तीस प्रतिबंधित ठिकाणी प्रवेश करता येणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील महसूल अधिकारी -कर्मचारी,पोलीस अधिकारी-कर्मचारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने तसेच तहसील कार्यालय, परंडा यांनी नियुक्त केलेल्या पथकास तसेच त्यांच्या वाहनास लागू होणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी कळविले आहे.